हिंगोली : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी रविवारी २२ मार्च रोजी अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यूमध्ये हिंगोलींकर सहभागी झाले असून जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी संचारबंदी पाळत प्रत्येकांनी आपल्या घरात राहणेच पसंत केले.
हिंगोली शहरातील मुख्य चौकाचौकात शुकशुकाट दिसून आला. यामध्ये श्री अग्रसेन महाराज चौक, बसस्थानक, महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तसेच शहरातील इतर मुख्य रस्तेही निर्मनुष्य झाले आहेत. शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी रात्री १० वाजेपर्यंत देशभरातील पॅसेंजर रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हिंगोली येथील रेल्वेस्थानक परिसरात शुकशुकाट होता. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून २१ व २२ मार्च रोजी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याच्या जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यानुसारच पंतप्रधानांनी केलेल्या जनता कर्फ्यू आवाहनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे नागरिक सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ९ वाजेपर्यंत या कालावधीत घराबाहेर न पडता स्वत:हून संचारबंदी पाळून कोरोना विषाणू विरुध्द लढा देत आहेत.