हिंगोली : जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार हिंगोली शहरात आज १० एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील खालील पाच ठिकाणीच भाजी -फळ विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मुख्य भाजीमंडई पुढील आदेशपर्यंत बंदच असणार आहे.
हिंगोली शहरातील रामलीला मैदान, जिल्हा परिषद शाळा, मंगळवारा आठवडी बाजार, रेल्वे मैदान( महाआरोग्य शिबीर स्थळ) तसेच खटकाळी बायपास येथे एकतर्फी रस्त्यावर भाजीपाला व फळविक्री केली जाणार आहे. यापूर्वी नेमून दिलेले खालील ठिकाणी भाजीपाला व फळ विक्रीस बंदी करण्यात आली आहे. यामध्ये मेहराजुलूम मजिद परिसर, चिमणी बाजार, केमिस्ट भवन समोर तसेच पोळा मारोती चौक आदी ठिकाणी विक्री करण्यास बंदी घातली आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी हे नेमून दिलेल्या पाच ठिकाणी भाजी विक्री करू शकतील तसेच घरपोच सेवा नोंदणी झाली असेल तर त्यांनी दिलेल्या वेळेत घरपोच सुविधा मिळेल. किंवा काही अडचण आल्यास तात्काळ संपर्क साधवा असे आवाहन केले आहे.
भाजीपाला, किराणा, मेडिकल इतर खाजगी कारणासाठी कोणतेही वाहन वापरणे बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी पायी चालत यावे लागणार आहे. भाजी-फळ विक्रेते, किराणा मेडिकल आदींनी ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. तसेच स्वत: मास्क, तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक आहे. अन्यथा दंड ठोठावला जाणार असून यापुढे त्या विक्रेत्याच्या विक्रीला बंदी केली जाणार आहे.
घरपोच भाजी, फळे, किराणा, मेडिकल या सेवेचा लाभ घ्यावा व गर्दी टाळावी असे आवाहन प्रशासनातर्फे केले जात आहे. या अत्यावश्यक व अपरिहार्य परिस्थितीमध्ये आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक ०२४५६-२२२५६० अथवा मोफत टोल फ्री क्रमांक १०० वर संपर्क करावा असे न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी कळविले आहे.