औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : येथील ग्रामीण रुग्णालयात बेशुद्धावस्थेत २२ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या ६५ वर्षीय व्यक्तीचा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्याची ‘अँटिजन टेस्ट’ केली असता, तो पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांनी वाद घालून मृतदेह जबरदस्तीने घरी नेला. याप्रकरणी तिघांवर गुन्हाही दाखल झाले. असे असताना २३ आॅगस्ट रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन या मृत व्यक्तीस कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्याचा आदेश देऊन खळबळ उडवून दिली. या प्रकरणावरून आरोग्य विभागाचा आलबेल कारभार चव्हाट्यावर आला आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील आसोला येथील एका ६५ वर्षीय व्यक्तीस बेशुद्धावस्थेत ग्रामीण रुग्णालयात २२ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास नातेवाईकांनी दाखल केले; परंतु रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्याची माहिती रुग्णालय प्रशासनाला देऊनही कोणीच व्यवस्थित वागणूक दिली नसल्याने आम्ही मृतदेह गावाकडे घेऊन गेलो, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. रुग्णालयात दाखल झाल्याने संबंधित व्यक्तीची ‘अँटिजन टेस्ट’ केली असता, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत माहिती दिल्यानंतरही नातेवाईकांनी वाद घातला व रुग्णाला उचलून घेऊन गेले, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलीस ठण्याला लेखी पत्र देऊन कळविले. मृत व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कुटुंबातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
आसोला हे गाव कुरुंदा पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने पोलीस पाटील, ग्रामसेवक दिलीप पांढरे यांच्या सूचनेवरून मृत व्यक्तीवर रात्रीच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर ग्रामसेवक पांढरे यांनी कोरोना केअर सेंटरप्रमुख डॉ. अविनाश गायकवाड यांना कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची लेखी माहितीही दिली. त्यानुसार पथकाने कुटुंबातील १२ जणांना कोरोना केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन केले आहे. पाठोपाठ असोला या गावास कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. इथपर्यंत सारेकाही नियमानुसार चालले. २३ आॅगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक प्रेमानंद निखाडे यांनी औंढा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले. त्यात त्यांनी दाखल झालेली व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याने तिला केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्याची सूचना दिली. या पत्रावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उलट टपाली सदर रुग्ण मयत झाल्याची माहिती कळविली आहे.