हिंगोली: जिल्ह्यात रुग्णसंख्या रोजच वाढत चालली आहे. आज पुन्हा चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण रुग्णसंख्या १६४ झाली आहे. आतापर्यंत ९० रुग्ण बरे झाले असून ७४ जण उपचार घेत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी पहेनी येथील एका अकरा वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तो कालच्या एका रुग्णाच्या संपर्कातील आहे. आज पुन्हा वसमत तालुक्यातील हट्टा येथे विलगीकरणत भरती असलेल्या २९ वर्षे वयाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव आला आहे. त्याचबरोबर औंढा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये असलेल्या अन्य दोघांचा अहवालही पॉझिटिव आला आहे. आता जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या १६४ वर पोहोचली आहे. तर ९० जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. आता ७४ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. यामध्ये कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे ८, सेनगाव येथे १२, हिंगोली येथे २९, वसमत येथे १४ तर औंढा येथे दोघांवर उपचार सुरू आहेत.
या सर्वांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणे नाहीत. एसआरपीएफचा एक जवान औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. याशिवाय हिंगोली येथील आयसोलेशन वार्डमध्ये आठ रुग्ण दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. आतापर्यंत आयसोलेशन वार्ड व जिल्ह्यातील सर्व कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण २०७४ जणांना संशयित म्हणून भरती केले होते. यापैकी १६६८ जण निगेटिव्ह आले आहेत. १५६९ जणांना घरी सोडले आहे. तर ४९९ जण भरती आहेत. अजूनही १५९ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.
हिंगोली जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत चालल्याने प्रशासनाने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे सामाजिक अंतर, मास्क वापरणे, सैनिटायझरचा वापर आदी बाबी पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कामाशिवाय घराबाहेर पडू नये, लहान मुले वृद्ध व गंभीर आजाराने पीडित असलेल्या लोकांनीही घराबाहेर पडण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.