हिंगोली : हिंगोली एसआरपीएच्या 22 जवानांसह जिल्हा रुग्णालयातील एका परिचारिकेचाही अहवाल 4 मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील रुग्ण संख्या 76 झाली आहे. वरील 22 जवान हे मुंबई येथे कार्यरत होते. त्यामुळे आता 69 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच पूर्वीपासून आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या एसआरपीएफ जवानांचा 14 दिवसानंतरचा पहिला अहवाल देखील पॉझिटिव आला आहे.
गंभीर बाब म्हणजे जिल्हा रुग्णालयातील कार्यरत एका 25 वर्षीय परिचारिकेचाही अहवाल पॉझिटिव आला आहे. या 23 जणांचे रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाकडे अहवाल प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 76 झाली असून यातील एकास डिसचार्ज मिळाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीमध्ये एकूण 75 बाधित रुग्णावर उपचार सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी घरातच सुरक्षित थांबावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.