हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये जिल्ह्यातील एसआरपीएफ मधील मालेगाव येथे कार्यरत असलेल्या चार जवानांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
हा अहवाल 27 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथून प्राप्त झाला आहे. हे चार जवान एसआरपीएफ अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कोरंटाईनमध्ये भरती होते. या सर्व चार जवानांचा पहिला तपासणी अहवाल निगेटिव्ह आला होता. यापैकी तीन जवानांना 23 एप्रिल रोजी ताप सर्दी खोकला असल्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आली होते व एक जवानाला 24 एप्रिल रोजी आयसोलेशन वार्डमध्ये भरती केले होते. या चार जवानांचे थ्रोट स्वब अहवाल परत 25 एप्रिल रोजी घेण्यात आले. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून चारही जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्वांची प्रकृती स्थिर असून कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीला दिसून येत नाहीत. असे डॉक्टरांनी सांगितले. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे कोरोना पॉझिटीव्ह 11 रुग्ण ॲडमिट आहेत. यातील दहा जवान एसआरपीएफ हिंगोली तर एक जवान एसआरपीएफ जालना येथील आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली.