हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रूग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. काल 27 एप्रिल रोजी एकाच दिवसात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली होती. आता त्यापाठोपाठ सेनगाव येथील कोरंटाइन सेंटरमध्ये असलेल्या एका पाच वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
28 एप्रिल रोजी या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता हिंगोलीत एसआरपीएफ हिंगोलीचे 11 जवान तर जालना 1, एकूण बारा जवानांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर जालना येथील एका जवानाच्या संपर्कातील व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाली.
वरील एकूण 13 रुग्ण हे आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असून आज एका पाच वर्षीय बालकाचा अहवालही पॉझीटीव्ह आल्याने आता एकूण रुग्ण संख्या 14 झाली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी दिली.