आखाडा बाळापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरू आहेत. बँका समोरील गर्दी काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे आखाडा बाळापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँके समोर होणारी गर्दी पांगवण्यासाठी व सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी बँकेसमोर चुन्याने चौकोनी मार्किंग करून सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी जागा आखून दिली. बँकेने या उपायोजना केल्यानंतरही ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले ' डोके ' चालवत 'आयडियाची कल्पना ' पुढे आणली. 'सोशल डिस्टन ' साठी आखलेल्या जागेत आपला बँकेच्या रांगेतला नंबर राखण्यासाठी या चौकोनामध्ये आपले चप्पल ,बूट ,दुधाचे कॅन, बाजाराच्या पिशव्या ठेवून रांगेतली जागा आरक्षित केली. परंतु बँकेच्या कठड्यावर मात्र सर्वांनी एकत्र येऊन गप्पांचा फड रंगवत 'सोशल डिस्टन्स' चा पुरता फज्जा उडवला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण देशात टाळेबंदी लागू आहे. प्रत्येक माध्यमांमधून जनजागृती केली जात आहे .माणसाने माणसापासून सुरक्षित अंतर ठेवून राहण्याशिवाय पर्याय नाही हे सर्वजण ठासून सांगत आहेत .त्यासाठी सर्वांनी घरात बसावे म्हणून संचारबंदी लागू केली .संचार बंदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी तीन तासाची सुट्टी मिळाली की हे सगळे नियम धाब्यावर बसवून नागरिक एकत्र येत आहेत. सोशल डिस्टन्स चा पार बोजवारा उडवून टाकत आहेत. त्यातच किसान सन्मान योजनेचे दोन हजार रुपये, जनधन खात्यातले पाचशे रुपये या काळात जमा झाले आहेत .काही ठिकाणी पिक विम्याचेही पैसे मिळालेले आहेत. हे पैसे उचलण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून लोकांनी बँकांकडे गर्दी केली आहे. बँकांमधील गर्दी कमी होण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. बँकांच्या समोर सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी जागा आखून देणारी चौकोन तयार करण्यात आले .त्या चौकोनात उभे राहून रांगेत आल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत अशी सक्ती केली.
काही ठिकाणी ही सक्ती कामाला आली. परंतु आखाडा बाळापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत मात्र कोणतीच नियमावली लागू पडत नाही. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी कोणतीच मात्रा काम करत नाही हे दिसुन आले. जिल्हा बँकेतील गर्दी कमी व्हावी यासाठी पोलिसांनीही बँक प्रशासनाला खडे बोल सुनावले .परंतु नागरिक मात्र काही केल्या ऐकायला तयार नाहीत. बँक सुरू होण्याच्या अगोदर पासूनच येथे शेकडो जण गर्दी करून उभे राहिलेले दिसत आहेत. ही गर्दी कमी करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने सामाजिक सुरक्षा राखण्यासाठी अंतर निश्चित करून दिले. चुन्याने त्याची मार्किंग करून चौकोन आखून दिले. या चौकोनामध्ये उभे राहूनच रांगेतून पैसे घ्यावेत असेही सुचवले .पण बँक सुरू होण्याच्या अगोदर पासूनच लोकांनी बँकेपुढे गर्दी केली. आखून दिलेल्या चौकोनात उभे राहिल्याशिवाय आपली रांग तयार होत नाही हे कळल्यानंतर या नागरिकांनी काहीवेळ त्या चौकोनात उभे राहून जागा धरली .परंतु दुर- दुर राहून आपले मन रमत नाही आणि बँकाही लवकर उघडत नाहीत हे पाहून हळूहळू त्यांनी एस .टी. बस मध्ये जागा आरक्षित करण्यासाठी जसे आपले सामान ठेवले जाते, त्या पद्धतीचा अवलंब केला. रांगेतल्या या चौकोनामध्ये कोणी चप्पल ,कोणी बूट, कुणी बाजाराची पिशवी, कुणी दुधाची कॅन अशा वस्तू ठेवून रांगेतली आपली जागा आरक्षित केली. परंतु बँकेच्या समोर असलेल्या कठड्यावर एकत्रित बसून गप्पांचा फड रंगवला .सोशल डिस्टन्स चा पार फज्जा उडवला.
कोरोना विषाणूचे संकट किती गंभीर आहे याची या नागरिकांना खबरबात नाही असेच त्यांच्या वर्तनावरून दिसून येत आहे. पोलिसांनी आणि बँक प्रशासनाने जीव तोडून सांगितल्यानंतरही हे नागरिक आपल्या वर्तनात सुधारणा करत नाहीत. पैशासाठीची रांग मात्र कायम ठेवत आहेत .परंतु सोशल डिस्टन्स मात्र पाळत नाहीत .त्यामुळे जर एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यांच्यात आढळला तर किती गंभीर संकट ओढावेल ह्याचे यांना गांभीर्य नाही हेच यावरून दिसून येत आहे.