हिंगोली : जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. हिंगोली एसआरपीएफचा आणखी एक जवान पॉझिटिव्ह आला असून वसमत येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेला 21 वर्षे तरुणही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या 16 वर पोहोचली आहे.
27 एप्रिल रोजी एकाच दिवसात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ काल एका जवानासह सेनगाव येथील कोरंटाइन सेंटरमध्ये असलेल्या एका पाच वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 28 एप्रिल रोजी या बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे प्राप्त झाला आहे. आज नव्याने हिंगोली येथील एसआरपीएफचा एक जवान कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. याशिवाय वसमत येथील विलगीकरण कक्षात दाखल असलेला 21 वर्षीय तरुण पॉझिटिव आला आहे. तो 25 एप्रिलला बार्शी येथून या ठिकाणी दाखल झाला होता. त्यामुळे आता हिंगोलीत एसआरपीएफ हिंगोलीचे 12 जवान तर जालना 1 अशा एकूण 13 जवानांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर जालना येथील एका जवानाच्या संपर्कातील एका पाच वर्षे बालकाला ही कोरोनाची लागण झाली आहे. वरील एकूण 16 रुग्ण हे आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल आहेत. हिंगोलीतील एका जवानास उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने खबरदारी म्हणून त्याला औरंगाबाद येथे संदर्भित केली आहे. तर यापूर्वीच वसमत मधील एकास कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडलेले आहे. कालपर्यंत 14 रुग्ण झाल्याने प्रशासनाने जिल्ह्यात सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश काढले होते संचारबंदी अधिक कठोर करण्याचे आदेश दिले होते आज पुन्हा नव्याने दोन रुग्ण आढळल्याने आणखी जास्त खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे