लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील नगरसेवक नाना नायक यांच्या हिंगोली जिल्ह्यातून तडिपारीचा आदेश उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी काढला आहे. यापूर्वीही काही माजी नगरसेवक, पक्ष पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली असून एकेक करीत ही संख्या वाढतच चालली आहे.हिंगोली व कळमनुरी उपविभागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांच्या तडिपारीचे आदेश काढण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी लागोपाठ सुनावण्या घेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढली आहेत. सेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे, मनसेचे बंडू कुटे, राकाँचे शेख शकील आदी राजकीय मंडळींचेही तडिपारीचे आदेश निघाले होते. त्यातील अनेकांना विभागीय आयुक्तांकडून स्थगितीही मिळाली आहे. तर नगरसेवक नाना नायक यांचे प्रलंबित प्रकरणही आता निकाली निघाले आहे. नायक यांना दोन वर्षांकरिता हिंगोली जिल्ह्यातून तडिपार केले आहे.यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुढाºयांचे धाबे दणाणले आहेत. एका पक्षाच्या विभागीय अध्यक्षाचेही लवकरच आदेश निघू शकतात. मात्र त्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप होत आहे. यापूर्वीही राजकीय हेतूतून तडिपार करण्याचे आदेश काढले जात असल्याचे आरोप झाले. त्यातील काहींनी विभागीय आयुक्तांकडून स्थगितीही आणली. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची काही खैर नाही, असा यातून संदेश जाण्यास मदत होत आहे.
नगरसेवक नाना नायक तडिपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:17 AM