हिंगोली : धोंडे जेवणाहून परतणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी अडवून लुटल्याची घटना तालुक्यातील खंडाळा शिवारात ६ ऑगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास घडली. चोरट्यांनी या घटनेत महिलेच्या अंगावरील सुमारे दीड लाखांच्या दागिन्यांसह मोबाइल लंपास केल्याची माहिती आहे.
हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथील निवृत्ती नामदेव जगताप पत्नी व तीन वर्षाच्या मुलीसोबत ६ ऑगस्ट रोजी माळसेलू येथे आपल्या मामे सासऱ्याकडे धोंडे जेवणासाठी गेले होते. जेवणानंतर रात्री ८:३० वाजेच्या सुमारास ते दुचाकीद्वारे आपल्या गावी भांडेगावकडे निघाले होते. ते ९ च्या सुमारास खंडाळा शिवारात आले असता तिघाजणांनी त्यांची दुचाकी अडविली. त्यानंतर धमकावित निवृत्ती जगताप यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून घेतला.
यावेळी चोरट्यांनी मारहाण करीत निवृत्ती जगताप यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढून घेत पोबारा केला. निवृत्ती जगताप यांच्या पत्नीने आरडाओरड केली. परंतु, रात्रीच्या वेळी रस्त्यावर तसेच शिवारात कुणीही नसल्यामुळे मदत मिळू शकली नाही. या घटनेत चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपयांचे दागिने लुटल्याची माहिती आहे. घटनेची माहिती कळाल्यानंतर भांडेगाव, साटंबा, खंडाळा भागातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकानेही घटनास्थळी भेट दिली.