आखाडा बाळापूर ( हिंगोली ): येथील मुख्य बाजारपेठ, निवासी भाग, जि.प. शाळेसह इतरांनी ग्रा.पं.सह संगनमत करून जमीनीवर ताबा केला. त्यातून ग्रा.पं.भाडेवसूल करून नफा कमावत आहे. ती जागा रिकामी करावी व मोबदला मिळावा यासाठी जमिनीच्या मूळ मालक व वारसदारांनी हिंगोलीच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या प्रकरणी बाळापुरात २२७ भाडेकरू, ताबाधारक व इतर ९ आशा एकूण २३६ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामुळे बाळापूर व्यापारपेठेत एकच खळबळ माजली असून वकील शोधण्यासाठी धावपळ पहावयास मिळाली.
आखाडा बाळापूर येथील सर्वे नं. २५ मधील १० एकर ३६ गुंठे जमीन शासनाने संपादित केली होती. त्यासाठी मावेजा देवू केला होता. पण तो कमी असल्याने व नाराजीमुळे तो स्वीकारला नाही. परंतु कालांतराने ग्रामपंचायतीने या जागेत व्यापारासाठी, राहण्यासाठी भाडेतत्त्वावर जागा देवून टोलेजंग दुकाने उभारली आहेत. शिवाय सांस्कृतिक सभागृह, शाळा, कार्यालये, स्वा.सै. सभागृह थाटली आहेत. आज २३३ व्यापारी दुकाने ग्रामपंचायतीने भाड्याने दिलेली असून ग्रामपंचायत दरमहा एक लाख १६ हजार ५०० रुपये नफा कमावतो. मागील तीन वर्षात ४१ लाख ९४ हजार रुपये मिळकत मिळाली आहे. सदर जमिनीवरील हा ताबा काढून जमीन मूळ मालकास मिळावी व त्या जमिनीवर वर्षानुवर्षे कमाई करणार्यांकडून मोबदला मिळावा, या मागणीची याचिका सारजाबाई विठ्ठल बोंढारे व इतर यांनी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर, हिंगोली या न्यायालयात दाखल केली आहे.
अनेक दिग्गज यंत्रणांचा समावेशयात २२७ भाडेकरूंसह ग्रामपंचायत आखाडा बाळापूर, सरपंच, ग्रामसेवक, कुसूमताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहाच्या सर्वसक्षम यंत्रणा, मुख्याध्यापक जि.प. मुलींची शाळा बाळापूर, जी.एस. खुडे (आदिवासी वसतीगृह), दिपाजी पाटील स्वातंत्र्यसैनिक सभागृहाचे सक्षम अधिकारी, भूसंपादन अधिकारी, अप्पर पैनगंगा प्रकल्प नं. २, हिंगोली, जिल्हाधिकारी हिंगोली यांना न्यायालयाने समन्स बजावले असून २७ फेब्रुवारी रोजी न्यायाल्यात स्वत: किंवा वकीलामार्फत हजर होण्यास सांगितले जात आहे. मराठवाडा चौक ते आदिवासी वसतीगृहापर्यंत मुख्य बाजारपेठेत सर्वांनाच नोटिसा मिळाल्याने मोठी खळबळ माजली. समुहा-समुहाने व्यापारी वकीलांच्या शोधात असून चर्चेला मोठे उधाण आले आहे. एकंदरीत जागा हस्तांतरण ते दावा या काळाच्या ऐतिहासिक आठवणी यानिमित्ताने उजळल्या आहेत.