मागच्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यातील ३३ केद्रांवरील कोविशिल्ड व्हॅक्सिनचे डोस संपले आहेत. या डोसबाबत संपण्याच्या अगोदरच राज्य शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. आता कोव्हॅक्सिनचे डोसही संपण्याच्या मार्गावर असून जवळपास १ हजार ५०० डोस शिल्लक राहिले आहेत. अजून दोन दिवस पुरेल एवढा साठा सद्य:स्थितीत शिल्लक आहे. आजपर्यत कोव्हॅक्सिन डोस १० हजार ९७५ तर कोविशिल्डचे डोस ३९ हजार ९६७ नागरिकांना दिले आहेत. लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. नागरिकांचा उत्साह पाहून जिल्हा प्रशासन दोन्ही डोस लवकरात लवकर कसे येतील, यासाठी प्रयत्न करीत आहे.
कल्याण मंडपम येथे लसीकरणासाठी रांग
कोविशिल्डचे डोस संपले असून कोव्हॅक्सिनही संपून जाईल याची नागरिकांना कुणकुण लागली. त्यानंतर गुरुवारी शहरातील कल्याण मंडपम येथे कोव्हॅक्सिनचे डोस घेण्यासाठी रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. परंतु, कोव्हॅक्सिनचे डोस अजून दोन दिवस पुरतील, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.