हिंगोली: प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता असल्याने पिकांची काढणी करुन पिकांचे संरक्षण करावे, असा सल्ला ‘वनामकृ’ विद्यापीठाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
१७ व १८ फेब्रुवारी रोजी परभणी,औरंगाबाद, जालना, हिंगोली,नांदेड, बीड जिल्ह्यात वादळीवारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या रबी ज्वारी, हरभरा आणि ऑक्टोबरमध्ये लागवड केलेल्या गव्हाची लवकरात लवकर काढणी करुन सुरक्षित साठवणूक करावी. काढणीनंतर ढीग तयार करुन ताडपत्रीने झाकावीत. मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. वेळेवर लागवड केलेल्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पाॅलीश करणे ही कामे सुरु आहेत. पावसाची शक्यता असल्याने हळदीची उघड्यावर साठवण करु नये.
याचबरोबर संत्रा, मोसंबी या फळांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.जूनमध्ये लागवड केलेल्या केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडू नये म्हणून झाडास आधार द्यावा, असाही सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.