हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट अतिशय नुकसानकारक ठरली. मृत्यूचे दिवसागणिक येणारे आकडे डोळ्यात पाणी आणायला लावणारे आहेत. आता ही लाट ओसरत चालली. मात्र त्यामुळे बिनधास्तपणाही वाढत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत:च आपल्या आरोग्याची काळजी घेऊन नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेत एवढी तुफान गर्दी होती की, कोरोनाचा कहर संपला की काय? असे चित्र होते. याबाबत माध्यमांतूनही टीका झाली. त्यानंतर जागे झालेले पोलीस प्रशासन आज रस्त्यावर उतरले. मात्र आधी सबुरीने पथसंचलनातून जो संदेश द्यायचा तो दिला आहे. भविष्यात कडक पावले उचलण्याची वेळ येणार नाही, यासाठी ही सौम्य तंबी दिल्याचे दिसत आहे. मात्र यातून नागरिक किती बोध घेतात, हे आगामी काळातच कळणार आहे.
या पथसंचलनामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे आदींची उपस्थिती होती; तर मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
हिंगोली शहरातील बाजारपेठेत गर्दीला कोरोनाच्या नियमांची जाणीव करून देण्यासाठी पोलिसांना सक्त भूमिका घेण्याची वेळ न आलेलीच बरी, अशी सध्या स्थिती आहे. आगामी काळात शेतकऱ्यांना पेरण्यांची लगबग राहणार असून, नाहक गर्दी करणाऱ्यांचा त्यांना फटका सोसावा लागण्याची भीती आहे. शिवाय पोलीस सक्तीने वागले, तर व्यापाऱ्यांनाही आपल्या व्यापारावर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझर ही त्रिसूत्री काटेकोरपणे पाळण्याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.