हिंगोली : राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर देशभरातून चाहत्यांची मोठी गर्दी केली आहे. कोरोना नियमांचे पालन करत सर्वांनी खासदार सातव यांचे अंत्यदर्शन घेत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आज सकाळी आठ वाजेपासून कळमनुरी येथील निवास्थासमोर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
रविवारी उपचारादरम्यान खासदार राजीव सातव यांचे पुणे येथे निधन झाले. यानंतर रविवारी रात्री त्यांचे पार्थिव कळमनुरी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांचे पार्थिव सर्वांच्या अंत्यदर्शनासाठी घरासमोरील प्रांगणात ठेवण्यात आले. यावेळी कोरोना नियमांचे पालन, सामाजिक अंतर ठेवत त्यांचे हजारो चाहते, काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध पक्षातील नेते येथे अंत्यदर्शनासाठी आले होते. अंत्यदर्शन घेत असताना कुटुंबीयांसह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. सातव यांच्या कुटुंबीयांच्या व चाहत्यांचा आक्रोश मन गहिवरून येणारा होता.
यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्हा आणि पोलीस प्रशासन प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. ग्रामीण भागातूनही वाडी-तांड्यावरून खेड्यापाड्यातून आलेला त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात दिसत आहे. अनेक वृद्ध महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आमचा मुलगा गेल्याच्या भावना व्यक्त करत आहेत.