वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
हिंगोली : शहरातील शिवाजीनगर, कापड गल्ली, शास्त्रीनगर आदी भागांमध्ये मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारी उपकरणे बंद पडू लागली आहेत. महावितरण कंपनीने याची वेळीच दखल घेऊन शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कळमनुरी बसस्थानकात कचऱ्याचे ढीग
कळमनुरी : शहरातील कळमनुरी बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच कचरा टाकला जात आहे. यामुळे दुर्गंधी पसरली आहे. आगारप्रमुखांनी याची दखल घेऊन बसस्थानकात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी
कळमनुरी : तालुक्यात अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे छोटे-मोठे अपघातही होत आहेत. अवैध वाहतूक बंद करण्यात यावी, असे वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्यापतरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. दुसरीकडे अवैध वाहतूक वाढल्याने एस. टी. महामंडळाच्या उत्पन्नात घट होत आहे. पोलिसांनी तालुक्यातील अवैध वाहतूक बंद करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हरभरा, गहू पीक जोमाता
आखाडा बाळापूर : यावर्षी तालुक्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाला. विहिरी व तलाव भरले आहेत. रबी हंगामातील गहू व हरभरा सद्य:स्थितीत ग्रामीण भागात जोमात असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पाण्यामुळे हरभरा व गव्हाचे क्षेत्रही वाढले आहे. एकंदर पाण्याची मुबलकता असल्यामुळे रबी पिके चांगली येेतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
अस्ताव्यस्त वाहनामुळे वाहतुकीला अडथळा
कळमनुरी : शहरातील मुख्य रस्त्यावर काही दिवसांपासून अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. बहुतांश वेळा वाहनचालकांचे वादही होत आहेत. शहर वाहतूक शाखेने याची दखल घेऊन वाहतुकीची कोंडी सोडवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
रस्त्यावर खड्डे : वाहनचालक त्रस्त
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर ते वारंगा यादरम्यान रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून, वाहनांचे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
गतिरोधकाची मागणी
हिंगोली : शहरातील विश्रामगृहाजवळ वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही वाहनचालक वेगाने वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. संबंधित विभागाने याची दखल घेऊन या वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक बसवून वाहनांचा वेग कमी करावा, अशी मागणी होत आहे.