हिंगोली : जिल्हा परिषद माध्यमिकच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावेळीही पुढे ढकलली आहे. अनेक शाळांवर कमी विद्यार्थीसंख्या असताना एकाच विषयासाठी दोन-दोन शिक्षक आहेत. तर काही शाळांत एकही शिक्षक नाही. बदल्यांद्वारे ही तफावत दूर का केली जात नाही? असा सवाल माध्यमिक शिक्षकांतून केला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जवळपास २६ शाळांमध्ये माध्यमिक विभाग आहे. मात्र, यातील अनेक शाळांमध्ये आता विद्यार्थीसंख्या घटली आहे. विशेषत: शहरी भागात हा प्रकार प्रकर्षाने घडला आहे. तर ग्रामीण भागात विद्यार्थी असूनही शिक्षक नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या बहुविध प्रशाला, औंढा जिल्हा परिषद शाळा, कुरुंदा, हयातनगर अशा ठरावीक शाळांवरच शिक्षकांची गर्दी झाली आहे. यापैकी काही शाळांत तर विद्यार्थीसंख्या १०० पेक्षा खाली आली आहे. मात्र, एकाच विषयाला दोन-दोन शिक्षक आहेत. तर कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, येहळेगाव तुकाराम या शाळा एकाच शिक्षकावर चालत आहेत. शेवाळा येथे गणिताचा शिक्षक अद्याप मिळाला नाही. नर्सी नामदेव येथे विज्ञानासाठी शिक्षक नाही. मग या ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार कशी? हा प्रश्न आहे.
याबाबत शिक्षण सभापती महादेव एकलारे यांना विचारले असता ते म्हणाले, विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक असण्यासोबतच जेथे विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, अशा ठिकाणी शिक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल. विद्यार्थी असूनही शिक्षक नसतील तर अशावेळी प्रशासनाचा बदल्यांचा अधिकार वापरून जागा भरण्याबाबत प्रशासनाशीही चर्चा केली आहे. यावर मार्ग काढला जाईल.