जिल्ह्यात लसीकरणाचे जवळपास ३३ केंद्र आजमितीस आहेत. यामध्ये जिल्हा उपकेंद्र, आरोग्य केंद्राचा समावेश आहे. आतापर्यत ६२ हजार ९२० डोस आले होते. यामध्ये कोविशिल्ड ५० हजार, कोवॅक्सिन १२ हजार ९२० आहे. आतापर्यत ५७ हजार ८३२ डोस देण्यात आले आहेत. यामध्ये हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ४५ आणि ६० वर्षांवरील व्यक्तींचा समावेश आहे. या सर्वांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दररोज रुग्णसंख्या लक्षात घेता १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. परंतु, १६ वर्षांखालील मुलांना लस देण्याबाबतचा निर्णय अजून तरी झालेला नाही. तशी कोणतीही सूचना आलेली नाही. २० एप्रिल रोजी कोवॅक्सिनचे ३ हजार १४० डोस आले आहेत. यानंतर लगेच काही दिवसांत कोविशिल्डही येणार असल्याची माहितीही जिल्हा रुग्णालयाने दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विनामास्क व विनाकारण फिरु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
.... पण लसीकरण धिम्या गतीने सुरु
४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे ४ हजार ६५० रुग्ण आहेत. परंतु, त्यांचे लसीकरण मात्र धिम्या गतीनेच होत आहे. खरे पाहिले तर १ मे पासून तिसरा टप्पा सुरु आहे. लसीकरणाला केव्हा गती येईल, लसीकरणाला गती आली तरच सर्वांना लस वेळेवर मिळू शकते.
१६ वर्षांखालचे १०२० रुग्ण; पण लसीचा तुटवडा
एप्रिल महिन्यात १७, १८, १९ असे तीन दिवस जिल्ह्यातील तसेच शहरातील लसीकरण बंद होते. २० रोजी लसीची उपलब्धता झाल्याने लसीकरण सुरु झाले आहे. असे असताना कोविशिल्ड लस अजूनही उपलब्ध झालेली नाही. कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक वाढू लागले आहे. लसीचा तुटवडा असल्याने १६ वर्षांखालील मुलांचा कधी नंबर लागेल हा मोठा यक्ष प्रश्न आहे.
मुलांसाठी लस येत नाही तोपर्यंत....
मुलांसाठीच्या लसीचा निर्णय शासनाने अजून घेतला नाही. खरे पाहिले तर मुलांमध्येही कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे पालकांना भीती वाटू लागली आहे. १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वच लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता मुलांनाही लस द्यावी, असे पालकांचे म्हणणे आहे.