अकोला बायपास रस्त्यावर खड्डे
हिंगोली : शहरातील अकाेला बायपास परिसरात नेहमी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. याठिकाणी अकोलाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. यामुळे वाहनधारकांना रस्त्यावर वाहने चालवितांना मोठा त्रास होत आहे. तसेच रस्त्यातील खड्डयांमुळे वाहनधारकांचे सतत अपघात होत असल्याचे दिसून येत आहे.
वीजपुरवठा वारंवार खंडीत
नंदगाव : औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव, सिद्धेश्वर परिसरातील वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून विस्कळीत झालेला आहे. गाव व परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडीत होत असल्याने नागरिकांत महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. यासाठी वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
रस्त्याकाठी रसवंत्या वाढल्या
हिंगोली : शहरातील अकोला रस्त्यावर उसाच्या रसवंत्या वाढल्या आहेत. मागील चार दिवसांपासून दुपारी उन्हाची तिव्रता वाढत असून नागरिक या रसवंत्यावर उसाचा रस पिण्यासाठी मोठी गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर उसाचा रस अनेक रोगावर गुणकार असल्यामुळे नागरिक या रसवंत्याकडे रस पिण्यासाठी वळू लागला आहे.
वन्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी
औंढा नागनाथ : तालुक्यातील अंजनवाडा, देवाळा परिसरातील शेतात वन्य प्राणी घुसून शेतातील पिकांची मोठी नासाडी करीत आहे. मागील अनेक महिन्यांपासून शेतशिवारात वन्य प्राणी घुसून पिकांची नासाडी करीत आहेत. याबद्दल अनेकदा शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी केली. पण याचा काहीही उपयोग होत नसल्याचा दिसत आहे.
पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
कळमनुरी : यंदा पावसाळ्यात चांगला पाउस झाला आहे. तरीही तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील बोअर, विहीरी, नाले, ओढे कोरडेठाक पडले असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई उदभवली आहे. यामुळे बरेच नागरिक पाण्याच्या शोधार्थ वनवन भटकंती करीत असल्याचे दिसत आहे.
गावातील रस्ता दुरूस्त करण्याची मागणी
पांगरा शिंदे : वसमत तालुक्यातील पांगरा गावातील रेल्वे स्थानककडे जाणारा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या दीड किमी रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी अनेकदा केली आहे. गावातील हा रस्ता खराब झालेला असून याकडे संबंधीतांनी लक्ष देवून हा रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
तार कुंपनाच्या अनुदानाची मागणी
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील शेतशिवारात वन्य प्राणी शिरुन पिकांची मोठी नासाडी करीत असतात. यासाठी शासनाने गावातील शेतकऱ्यांना तारकुंपनासाठी अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत. गावातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट असून सदरिल अनुदान मिळाल्यास शेतकऱ्यास मोठा फायदा होईल असे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
रामेश्वर तांडा - वारंगा रस्त्याची दुरवस्था
रामेश्वर तांडा : कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा - वारंगा रस्ता हा पूर्णपणे दुरवस्थेत सापडला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना रस्त्यावरुन ये जा करताना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यासाठी हा रस्ता दुरूस्त व्हावा अशी मागणी दोन्ही गावातील गावकरी करीत आहेत.