हिंगोली : जिल्ह्यात शेतकऱ्यांना १ ते १० सप्टेंबरच्या काळात दोन- दोनदा अतिवृष्टीचा सामना करावा लागला. काही मंडळांचा अपवाद वगळला, तर सर्वत्रच ही परिस्थिती होती. मात्र, केवळ कळमनुरी तालुक्यातच अतिवृष्टीत नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असून, इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली जिल्ह्यात सध्या कृषी विभागाला कोणी वालीच नाही. प्रभारीवर कारभार सुरू असल्याने कृषी सहायक नावाचा घटक कुणालाच कधी जुमानत नाही. शिवाय महसूल विभागाकडेही अनेक लोकप्रतिनिधींनी निवेदने दिल्यानंतरही अतिवृष्टीत सरसकट नुकसान झाले नसले तरीही नदी, नाले, ओढ्याकाठच्या अनेक शेतकऱ्यांना फटका बसल्याने निदान तेवढ्यांना तर मदत मिळेल, अशी अपेक्षा लागली होती. जवळपास सर्वच लोकप्रतिनिधींनी अतिवृष्टीतील नुकसानीबाबत प्रशासनाला निवेदने दिली आहेत. सर्वच तालुक्यांतून तशा तक्रारी आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची छायाचित्रेही झळकली. मात्र, पंचनाम्यात हे प्रकार न आल्याने यामागचे गणित कळायला मार्ग नाही.
जिल्हा प्रशासनाकडे फक्त कळमनुरी तालुक्याचाच पीक नुकसानीचा अहवाल आला आहे. या तालुक्यातील पाच मंडळांमध्ये ५३ गावांतील ११ हजार ५०० शेतकऱ्यांचे ८९१९ हेक्टर पीक क्षेत्र अतिवृष्टीच्या कचाट्यात सापडले आहे. यापैकी ७६६६ शेतकऱ्यांचे ६८३४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. या तालुक्यांसह इतर तालुक्यांतही जीवितहानी, घरांची पडझड, गुरे वाहून जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचाच केवळ अहवाल देण्यात आला आहे.
सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान
३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांमध्ये सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले आहे. ६७१२ शेतकऱ्यांच्या ६१९४ हेक्टर पिकाला फटका बसला, तर हळदीचे ३२० शेतकऱ्यांचे २१५ हेक्टरवर नुकसान तरकेळीचे ६३४ शेतकऱ्यांचे ४२५ हेक्टरचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे, तर ३३ टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ३८३४ असून २०८५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे.