हिंगोली : चालूवर्षीच्या खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ६ हजार ११९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला; मात्र सप्टेंबरमध्ये १.५० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असताना १४ आॅक्टोबरपर्यंतही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. अधूनमधून सुरूच असलेल्या पावसामुळे या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत असल्यानेच ही स्थिती उद्भवल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांचे म्हणणे आहे.
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे खरीप हंगामातील उडीद, मूग, कापूस आणि विशेषत: सोयाबीन ही सर्वच पीके पूर्णत: पाण्याखाली सापडली होती. बहुतांश ठिकाणी सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना चक्क कोंब फुटल्याचाही प्रकारही घडला. नुकसानीतून काहीअंशी बचावलेल्या सोयाबीनची शेतकऱ्यांनी काढणी केली; परंतु एकरी उत्पन्नात विक्रमी घट आली आहे. दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे पाठविणे आवश्यक असताना पंचनाम्यांची प्रक्रिया अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मदत नेमकी कधी मिळणार, असा सवाल शेतकऱ्यांतून केला जात आहे.
सततच्या पावसामुळे प्रशासकीय यंत्रणाही पेचातयासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही.डी. लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता, ज्या भागात नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, त्याच भागात काही दिवसातच पुन्हा धो-धो पाऊस होऊन नुकसान झाल्याचा प्रकार घडल्याने दुसऱ्यांदा पंचनामे करावे लागत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोरही मोठा पेच निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. याशिवाय ढगाळी वातावरण कायम असून अधूनमधून पाऊसही कोसळत असल्याने पंचनामा प्रक्रियेत व्यत्यय निर्माण होत आहे. या अडचणींमुळेच प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागत आहे. असे असले तरी लवकरच ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही लोखंडे यांनी दिली आहे.