हिंगोली येथील शिवलीला लॉन्सच्या परिसरात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आ. सतीश चव्हाण, आ. तानाजी मुटकुळे, आ. राजू पाटील नवघरे, माजी आ. भाऊ पाटील गोरेगावकर, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, गजानन घुगे, रामराव वडकुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी टोपे पुढे म्हणाले की, राज्यात तसेच देशामध्ये उसाचे उत्पादन क्षमतेपेक्षा अधिक झाले असून, अधिकचा झालेला ऊस कसा गाळप करावा, याबाबत योग्य निर्णय ते घेतीलच. देशात उसाऐवजी बीटपासून साखरनिर्मिती करण्याबाबत त्यांनी विदेश दौराही केला आहे. त्यामुळे पुढील काळात देशात उसासोबतच बीटपासूनही साखरेचे उत्पादन होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंगोली येथील शासकीय रुग्णालयाला एमआरआय मशीन देऊ व रिक्त जागा भरल्या जातील, असेही ते म्हणाले.
यावेळी दांडेगावकर म्हणाले, साखर कारखानदारीसाठी चांगले काम करण्यासाठी मिळालेल्या संधीमुळे तसे काम निश्चित उभे करू, तर पुढील काळात सर्वांना सोबत घेऊन हिंगोली जिल्ह्याचा उद्योग जिल्हा हा ठसा मिटविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चव्हाण यांच्याकडे शिकवणी लावली पाहिजे
नगरसेवक व्हायचे असेल, तर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्याकडे शिकवणी लावली पाहिजे. राज्यात कोणतेही सरकार असो, निधी कसा मिळवावा, विकासकामे कशी करावीत, हे त्यांच्याकडून शिकले पाहिजे, असे सांगत दिलीप चव्हाण यांच्या कामाचे टोपे यांनी कौतुक केले.