बासंबा फाटा - गावापर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे
बासंबा : गावातून फाट्यापर्यंंत जाणाऱ्यावर रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. याचबरोबर गावातील इतर खासगी वाहनचालकांसह प्रवाशी वर्गालाही या रस्त्यावरील गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासह रस्ता दुरूस्तीची मागणी गावकरी करीत आहेत.
गावात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव गावात बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साठले आहेत. गावातील बसस्थानक, उपकेंद्र व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरामध्ये कचऱ्याचे ढिगारे असल्याने या ठिकाणी सदैव दुर्गंधीमय वातावरण राहत आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. गावातील कचऱ्याचे ढिगारे हटविण्याची मागणी गावकरी बऱ्याच दिवसांपासून करीत आहेत.
नवीन वसाहतीतील रस्त्याची दुरवस्था
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथीन नवीन वसाहती भागातील रस्त्यांची दुरवस्था वाढली आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठा त्रास होत आहे. रस्त्यावर गिट्टीही उघडी असल्यामुळे अनेक वाहने घसरुन याठिकाणी पडत आहेत.
गावात नालीचे बांधकाम नाही
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात आतापर्यंत नालीचे काम करण्यात आलेले नाही. यामुळे गावातील प्रत्येक भागाच्या रस्त्यावर नागरिकांच्या घरातील सांडपाणी जमा होत आहे. गावकऱ्यांसह वाहनचालकांना या रस्त्यावरुनच वाट काढावी लागत आहे. वाहने गेल्यामुळे या रस्त्यावर खड्डे होत असून त्यामध्ये सांडपाणी मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे. यासाठी गावात नाल्या करण्यात याव्यात अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
सिमेंट रस्त्याची मागणी
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावामध्ये पक्के रस्ते नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या अनेक गावात सिमेंट रस्ते करण्यात येत असून साखरा गावामध्येही सिमेंट रस्ते करण्यात यावे अशी मागणी होत आहे. गावात मुरूमाचे रस्ते असून पावसाळ्यात याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. यासाठी गावात सिमेंट रस्ते करावे अशी गावकरी मागणी करीत आहेत.
वन्य प्राण्याचा उपद्रव वाढला
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना शेतशिवारामध्ये वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला आहे. तुरी उधळल्यामुळे हे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. पण हरभरा व गहू पीक बहरले असून या पिकांमध्ये वन्य प्राणी घुसत आहे. शेतशिवारातील पिकांमध्ये वानरांच्या टोळीसह रानडुकर व रोही घुसून पिकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिवस - रात्र शेतात राहून पिकांची जोपासणी करावी लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
प्रशासक गावात येईना
सवना : सेनगाव तालुक्यातील सवना गावालगत असणाऱ्या सुरजखेडा ग्रामपंचायतीचे प्रशासक दीड महिन्यांपासून गावात आले नाही. यामुळे अनेक गावकऱ्यांचे शासकीय क्षेत्रातील कामे खोळंबले आहेत. तसेच प्रशासक नसल्याने गावातील विकास कामेही मार्गी लागत नाही. यासाठी प्रशासकाने गावात राहावे अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.