कनेरगाव नाका : येथील योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने गावात पंधरा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. कनेरगाव नाका येथील पाणीपुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. येथील प्रशासक याकडे दुर्लक्ष करत आहेत. ग्रामसेवक सुरेश झिंजाडे यांनी पाणीपुरवठा पूर्ववत सुरु व्हावा, यासाठी आवश्यक पाठपुरावा केला. परंतु, येथील प्रशासक यासाठी मान्यता देत नसल्याने गावातील पाणीपुरवठा गेल्या १५ दिवसांपासून बंदच आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने हे कर्मचारीही काम करायला तयार नाहीत. प्रशासकांच्या मान्यतेशिवाय कोणतेही काम याठिकाणी होत नाही. प्रशासक मान्यता देत नसल्याने गावातील अनेक विकासकामे रखडली आहेत. गावातील पाणीपुरवठा बंद असल्याने महिलांना पैनगंगा नदीवर किंवा विहिरीवर पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे. या परिस्थितीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
यासंदर्भात प्रशासक गीते यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे माझ्याकडे वेळ नाही.