लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे दोन गटांत तणाव निर्माण झाल्याची घटना १४ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. दोन्ही गटातील ग्रामस्थांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला.आजेगाव येथील म्हाळशी-ताकतोडा रस्त्यावरील टेलीफोन पोलवर बॅनरवर ध्वज लावण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे येथील परिसरात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेत पोलीस बंदोबस्त वाढविला. आजेगाव येथे सकाळी ८.३० वाजता दाखल झालेल्या रिसोड - ताकतोडा बसच्या (बस क्रमांक एमएच-४०-८५३१) काहींनी काचा फोडल्या. बसमधील प्रवासी उतरले होते. चालक संतोष तान्हाजी बगाडे यांनी सदर बस गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करीत अज्ञात जमावाकडून बसची तोडफोड करून नुकसान केल्याची फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव, सेनगाव, नर्सी पोलीस ठाण्याचे पोलिस तसेच डी.वाय.एस.पी. भोरे घटनास्थळी दाखल झाल्याने तणाव निवळला. यावेळी दंगा नियंत्रण पथक व ‘आर.सी.प्लाटून’ आजेगावात तैणात करण्यात आले होते. अचानक निर्माण झालेल्या तणावामुळे आठवडी बाजार बंद होता. गोरेगाव पोलीस ठाण्यात आलेल्या ग्रामस्थांना उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले. तसेच दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आजेगाव येथे दोन गटांत वाद; पोलीस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 1:07 AM