कोरोनामुळे काही काळ खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले होते. त्यामुळे शासनाच्या मोठ्या महसुलावर पाणी फेरले गेले होते. यात सुधारणा होण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात मोठी सूट दिली. सात टक्क्यांवरून चार टक्क्यांवर मुद्रांक शुल्क आणले. त्यामुळे खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्येही वाढ झाली. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल शासनाला मिळाला आहे. मागील चर महिन्यांत या आदेशाचा परिणाम स्पष्टपाणे दिसत होता. त्यात प्रतिमहिना ५०० पेक्षा जास्त व्यवहार झाले. सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात हे चित्र होते. डिसेंबरमध्ये तर यात विक्रमच झाला. तब्बल १,१६४ दस्तांची नोंदणी झाली. त्यामुळे मागील आठ महिन्यांत जेवढी नोंदणी झाली नाही, त्यापेक्षा जास्त या चार महिन्यांत झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कार्यालयातही तुफान गर्दी होत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्गात जमिनी गेल्याने अनेकांकडे आलेली रक्कम ते मालमत्तांमध्ये गुंतवत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हिंगोलीत ८.९३ कोटींचा महसूल मिळाला
जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या हिंगोलीसह तालुक्यात विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. त्यामुळे मागील चार महिन्यांत शासनाने मालमत्तांच्या व्यवहारासाठी मोठी मुद्रांक सूट देऊनही सव्वातीन कोटींचा महसूल मिळाला आहे.
एकट्या डिसेंबर महिन्यात १.४१ कोटी मिळाले असून, यापूर्वी नेहमीच जास्त व्यवहार असणाऱ्या जून महिन्यात १.१७ कोटींचा महसूल मिळाला होता. त्यावेळी सूट नसल्याने अवघ्या ४८७ व्यवहारांवर हा महसूल मिळाला.
ऑगस्टमध्ये महसूल घटताच हा निर्णय जाहीर झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात व्यवहार झाल्याने एकूण महसूल ८.९३ कोटींचा मिळाला आहे.
कोरोनाचे नियम पाळले गेले का?
दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थलांतर आता बीएसएनएलच्या जुन्या कार्यालयात झाले आहे. या ठिकाणी आधीच अडचणीची जागा आहे. त्यातच कनेक्टिव्हिटी व इतर कारणांनी दस्त नोंदणीला विलंब होते. त्यातच दलालांचीही घिसाडघाई असते. त्यामुळे वारंवार सूचना देऊनही कुणी कोरोनाविषयक नियम पाळत नसल्याचे चित्र दिसत होते.
सूट असल्याने वाढले व्यवहार
कोरोनामुळे यंदा काही काळ खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नव्हते. मात्र शासनाने सवलत जाहीर केल्यानंतर या व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षभरात जवळपास ९ कोटींचा महसूल मिळाला आहे. ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरलेल्यांची नोंदणी अजूनही केली जात आहे.
आर.पी. गायकवाड
दुय्यम निबंधक हिंगोली