हिंगोली : पूर्वी अनेक आजारांवर घरगुती उपाय करूनच रुग्णांना आराम पडेल, अशी व्यवस्था केली जायची. आजीबाईच्या बटव्यातील या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आजही तेवढ्याच कामी येत आहेत. कोरोनाच्या बचावासाठी गुळवेल, तुळशीची पाने, अश्वगंधा, हळद, सुंठ-मिऱ्याचा काढा असे अनेक बाबींचे काढे रोगप्रतिकारक शक्ती वाढवून या आजारापासून दूर ठेवण्यासाठी मदतीच्या मानल्या जात आहेत.
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पहिली लाट आल्यानंतर ती ओसरली. तोपर्यंत एव्हाना या काढ्यांचा वापर अनेकांनी सुरू केला होता. घरच्या घरी अथवा गाव परिसरात मिळणाऱ्या या औषधींचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला होता. आता पुन्हा दुसऱ्या लाटेनंतर याच औषधांचा वापर करून अनुभवी व जुन्या मंडळींकडून रोगप्रतिकारकशक्ती वाढविणाऱ्या या बाबींसाठी आग्रह धरला जात आहे. अनेकांना या बाबींचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मोठ्या रुग्णालयांत महागड्या औषधांचा वापर करून बरे होण्यासाठी एकीकडे लाखो रुपये खर्च केले जात असताना अनेक गावांत घरगुती उपायांनी रोगप्रतिकारक शक्तीचा बूस्टर डोस घेऊन या आजारापासून दूर राहण्याचे प्रयत्न होताना दिसत आहेत. या उपायांनी आजार होणारच नाही, हे सांगणे सध्या तरी अवघड आहे. मात्र यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हे आयुर्वेदही सांगतो. अनेकांना एरवी यासाठी हेच उपाय सांगितले जातात. तेच वर्षानुवर्षे आपण आजीबाईंच्या बटव्यातील औषधी म्हणून वापरत आलो आहोत. आता कोरोनाच्या काळात त्याचे महत्त्व अनेकांना पटत असल्याचेही दिसून येत आहे. शिवाय रोजच्या वापरातील या औषधी असल्याने त्यासाठी मोठा खर्च करण्याचीही गरज नसल्याने त्याचा वापर अजूनही कायम असल्याचे दिसून येत आहे.
आयुर्वेदात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक बाबींचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. आजही ग्रामीण भागात या बाबींचा वापर केला जातो. आवळ्याचे चूर्ण, गुळवेल, अश्वगंधा, सुंठ-मिऱ्यांचा काढा, हळद, दालचिनीचा वापर करून रोगप्रतिकारशक्ती वाढविता येते. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी बऱ्यापैकी मदत होते. शहरी भागात उपाशीपोटी च्यवनप्राश खाऊन रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न होतो. कोरोनामुळे या सर्व बाबींना पुन्हा महत्त्व आले आहे.
-डॉ. गजानन धाडवे, आयुर्वेदिक तज्ज्ञ
मागील वर्षभरापासून सतत कोरोनाची भीती जाणवत आहे. मात्र आता उतारवयात घरगुती उपचार पद्धती व आयुर्वेद साधनांनी कोरोनापासून दूर राहण्यात यश मिळविले. ज्यात सुंठ, मिरे, दालचिनी, हळद यांचा काढा, हळदीचे वाफाळलेले दूध आदींचे नियमित सेवन केले. कुटुंबातील सदस्यांनाही दिले.
पार्वतीबाई सुभानराव खराटे, कौठा
कोरोना आल्यापासून आम्ही सतत घरगुती उपायांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भर दिला. आजही घरातील सदस्यांना सुंठ, मिरे, दालचिनी, अश्वगंधा, गुळवेल आदींचा काढा देतो. हळदीचे दूध, गरम पाण्याची वाफ घेणे हे नित्यनेमाने करून कोरोनापासून कुटुंबाचा बचाव करीत आलो आहोत.
सुभद्राबाई बाबाराव खराटे, कौठा
आता पूर्वीसारखा झाडपाल्याच्या औषधाला मानणारा वर्ग राहिला नाही. मात्र कोरोना आल्यापासून आम्ही सातत्याने गुळवेल, सुंठ, मिरे, अद्रक, दालचिनी, हळद आदींचे प्रयोग करूनच रोगप्रतिकारक शक्ती राखली. यातूनच कोरोनावरही यशस्वी मात करता आली. वनौषधींची जोपासना करून त्याचा वापर हाच कोरोनावर रामबाण उपाय आहे, असे वाटते.
जनाबाई भाऊराव गुहाडे, पोत्रा
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण १५,३६४
कोरोनामुक्त रुग्ण १४,५१४
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण ५१७
कोरोना मृत्यू ३३३