लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १०८ रूग्णवाहिका क्रमांकाची सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ रूग्णांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यास मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांसाठी आपात्कालीन रूग्णवाहिका जीवनदायी ठरली आहे. जिल्ह्यात एकूण १२ रूग्णवाहिकेद्वारे रूग्ण व जखमींना सेवा दिली जात आहे.आपत्कालीन वेळेत तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाकडून १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा हिंगोलीत पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ४९ हजार ३ जणांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली आहे. विशेष म्हणजे गरोदर मातांना १0८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळावेळी धावून गेल्याने १७३५० मातांना मदत झाली. रस्त्यावरील भीषण अपघातात झालेले जखमी, हृदयविकार, हाणामारीत जखमी झालेले व्यक्ती तसेच विषबाधा, विजेचा शॉक यासह इतर रुग्णांना जवळील रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात रूग्णवाहिकेची मदत झाली आहे. त्यामुळे हजारो रूग्णांना वेळेत दाखल करून घेतल्याने त्यांचे प्राण वाचले. गंभीर रूग्ण रूग्णालयात आणताना अनेकदा कठीण प्रसंगानाही चालकांना तोंड द्यावे लागते. ट्रॅफिक किंवा रेल्वेगेटजवळ रूग्णवाहिका अडकून पडतात. त्यामुळे अशा परिस्थितीत जोखीम अधिकच वाढते.अपघातातील जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पाठविण्याचे नियोजन असते. या क्रमांकावर दूरध्वनी आल्यानंतर हे नियोजन तत्काळ करण्यासाठी यंत्रणा कायम सज्ज ठेवावी लागते. अपुऱ्या यंत्रणेमुळे कठीण प्रसंगी मोठी कवायतही करावी लागते. तसेच गरोदर माता, अपघातग्रस्त जखमींना रूग्णवाहिकेमुळे मदत होत आहे. मागील पाच वर्षांत अपघातातील ३८६९ जखमींना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल केले, असे १०८ रूग्णवाहिकेचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. ईनायततुल्ला खाँन यांनी सांगितले.१०८ रूग्णवाहिकेत नियमाप्रमाणे ३ डॉक्टर सेवा देण्यासाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. परंतु रूग्णवाहिकेत दोनच डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे या डॉक्टरांना अनेकदा डबल ड्यूटी करावी लागते. शिवाय तसे नियोजन केले जाते. तात्काळ वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी १०८ या रूग्णवाहिकेत गंभीर रूग्ण असल्याने याकामी अनेक डॉक्टर जबाबदारी घेण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे डॉक्टरांचा तुटवडा असतो, असे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले. १०८ रूग्णवाहिकेत अत्याधुनिक यंत्रणा व सुविधा उपलब्ध असल्या तरी डॉक्टरांची रिक्त पदे भरणे तितकेच महत्त्वाचे आहे.
१०८ रुग्णवाहिकेमुळे मिळाले हजारो रुग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:03 AM