सेनगाव (हिंगोली) : मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणास सर्वाेच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे सेनगाव येथील समाज बांधव आक्रमक झाले आहेत़. शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, यासह आरक्षणासंबंधीच्या इतर मागण्यांचे निवेदन सोमवारी सकाळी सकल मराठा समाजातर्फे सेनगाव तहसीलदारांकडे देण्यात आले.
शैक्षणिक, आर्थिक बाबतीत मराठा समाज हा मागासलेला आहे, असा स्पष्ट अहवाल राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेला आहे़. मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढून न्यायाची मागणी केली आहे़. त्यानुसार शासनाने मराठा समाजाला आरक्षण जाहीर केले; मात्र सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली. स्थगिती उठविण्यासंदर्भात शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, आरक्षणासंदर्भात त्वरीत अध्यादेश काढावा, या प्रकरणाचा अंतिम निपटारा होईपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सवलती व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात यावी, यासह इतरही मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.