नाल्याचे पाणी रस्त्यावर
हिंगोली : शहरातील गंगानगर, शिवाजीनगर, इंदिरानगर आदी भागांतील रस्त्यांवर नाल्याचे पाणी येत आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून पादचाऱ्यांना त्रास होत आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन रस्त्यावरील पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधकाची मागणी
डिग्रस कऱ्हाळे : हिंगोली तालुक्यातील डिग्रस फाटा येथे वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हा रस्ता राज्य रस्ता असून वाहने वेगाने चालविली जात आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघातही घडून येत आहेत. अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने डिग्रस कऱ्हाळे फाटा येथे गतिरोधक बसवावे, अशी मागणी डिग्रस कऱ्हाळे येथील नागरिकांनी केली आहे.
‘स्वच्छतागृह दुरुस्त करावे’
हिंगोली : शहरातील बसस्थानकामधील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास होत आहे. वेळोवेळी एसटी महामंडळाच्या संबंधित विभागाला सांगूनही कोणीही लक्ष देण्यास तयार होत नाही. दुसरीकडे बसस्थानकातील गिट्टी उघडी पडली असल्यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. वाढत्या धुळीमुळे प्रवाशांना श्वसनाचे आजार जडत आहेत. महामंडळाच्या वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
‘वन विभागाने वानरांचा बंदोबस्त करावा’
हिंगोली : अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरांनी शहर गाठले असून अंगणात तसेच छतावर ठेवलेल्या वस्तूंची नासाडी वानरे करीत आहेत. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास काही वानरे अंगावर धावून येत आहेत. शहरातील शिवाजीनगर, शास्त्रीनगर, तोफखाना, कापड गल्ली, मंगळवारा, गंगानगर आदी ठिकाणी वानरांचा संचार पाहायला मिळत आहे. वन विभागाने याची दखल घेऊन वानरांना जंगलात नेऊन सोडावे.
वळण रस्ते बनले धोकादायक
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर परिसरातील वळण रस्त्यावर मागील काही दिवसांपासून खड्डेच खड्डे झाले आहेत. वाहनचालकांना वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वळण रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला कळविले. परंतु, अजून तरी कोणीही लक्ष दिले नाही. खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.
स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी
कळमनुरी : शहरातील बसस्थानकात मागील काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. एसटी महामंडळाने याची दखल घेऊन बसस्थानक व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.