‘नव्याने गतिरोधक बसवा’
हिंगोली : कयाधू नदी पुलाजवळील गतिरोधक धोक्याचे बनले असून, वाहनचालक गतिरोधकाच्या बाजूने वाहने चालवत आहेत. यामुळे अघाताची शक्यता आहे. वेळोवेळी संबंधित विभागाला सांगण्यात आले; परंतु अद्याप तरी कोणीही लक्ष दिलेले दिसत नाही. या ठिकाणी गतिरोधक नव्याने टाकावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वाहनचालकांची झाली पंचाईत
हिंगोली : हिंगोली - नांदेड दरम्यानच्या महामार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. लासीना पाटीजवळ या महामार्गावरील पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. एका बाजूने वळण रस्ता काढून देण्यात आला होता. १६ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बाजूने रस्ता काढून देण्यात आला. मात्र पूर्वीचा वळण रस्ता व्यवस्थित बंद केला नव्हता. त्यामुळे वाहनचालकांना पुन्हा पाठीमागे पेट्रोल पंपापर्यंत येऊन दुसऱ्या बाजूने कळमनुरीकडे जावे लागत होते.
गावांचे नामफलक गायब
हिंगोली : हिंगोली ते नांदेड मार्गावर विविध गावे आहेत. गावांची नावे समजण्यासाठी महामार्गावर गावांच्या नावाचे फलक बसविण्यात आले होते. मात्र, त्यातील काही फलक गायब झाले आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील प्रवाशांना पुढे कोणते गाव आहे, याची माहिती मिळत नाही.
दारुड्यांचा वावर वाढला
कळमनुरी : येथील बसस्थानकातून जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांत बस धावतात. तसेच कळमनुरीला परिसरातील गावे जोडलेली आहेत. त्यामुळे दिवसभर प्रवाशांची बसस्थानकात वर्दळ असते. मात्र, सायंकाळी काही दारुडे बसस्थानक परिसरातच दारू पित आहेत. त्यामुळे प्रवाशांना याचा त्रास होत असून, येथील दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.