नाल्यांवर औषधाची फवारणी करावी
हिंगोली: शहरातील मंगळवारा, पेन्शनपुरा, तोफखाना आदी भागांतील नाल्या अनेक दिवसांपासून साफ करण्यात आल्या नाहीत. नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाने वेळीच याची दखल घेऊन शहरात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
दगडी चुरीमुळे वाहनचालक त्रस्त
हिंगोली: शहरातील नांदेड नाका ते उड्डाणपुलापर्यंत दगड चुरी अंथरुण त्याची दबई करण्यात आली. परंतु, या दगडी चुरीमुळे वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. दोन दिवस झाले तरी दगडी चुरीवर डांबर टाकले नाही. संबंधित विभागाने याची दखल घेऊन दगडी चुरीवर डांबर टाकून वाहनचालकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
वीज खंडित; शेतकरी त्रस्त
पुसेगाव: सेनगाव तालुक्यातील पुसेगाव व परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्य: स्थितीत विहिरींना भरपूर पाणी आहे. परंतु, वीज खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याअभावी उगवलेले पीक सुकून जात आहे. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
हिंगोली: अन्न आणि पाण्याच्या शोधात वानरे शहरात दाखल झाली आहेत. शहरातील शिवाजीनगर, गंगानगर, जिल्हा परिषद परिसर आदी ठिकाणी वानरांनी उच्छाद मांडला आहे. वानरांना हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास अंगावरुन धावून येत आहेत. वनविभागाने सापळा रचून वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.