रस्त्यावरील धुळीला शेतकरी कंटाळले
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या रस्त्यावर धूळ होत असून ती शेतातील पिकावर जमा होत असल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे. तसेच पिकांवर धूळ जमा होत असल्याने पीक करपत असल्याचे दिसत आहे. यासाठी शेतकरी धुळीच्या त्रासाला कंटाळला आहे.
गावातील नाल्या उघड्या अवस्थेत
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गावातील अनेक नाल्यावर ढापा बसविण्यात न आल्यामुळे ह्या नाल्या उघड्या अवस्थेत आहेत. नालीवर ढापा नसल्याने अनेक वाहनधारकांचे वाहन रात्रीच्या वेळीत नालीत घुसत आहेत. याचबरोबर नालीवर ढापा नसल्याने यातून दुर्गंधीही बाहेर पडत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विवेकानंद नगर - अकोला बायपास रस्त्याची लागली वाट
हिंगोली : शहरातील विवेकानंदनगर - अकोला बायपासकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठाले खड्डे झाले आहे. या रस्त्यावरून अनेक दुचाकीसह चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू असते. पण रस्त्यावरील दुरवस्थेमुळे या वाहनधारकांना वाहन चालवितांना मोठी कसरत करावी लागत आहे.
रात्रीच्या वेळी पोलीस गस्तीची मागणी
हिंगोली : शहरातील जिजामातानगर, शाहुनगर, आंबेडकरनगर, गायत्री शक्तीपीठ परिसरात रात्रीच्या वेळी भुरट्या चोरांचे प्रमाण वाढले आहे. अनेकांचे दुचाकीसह संसारोपयोगी साहीत्य चोरीला गेल्याचे प्रकारही घडत आहे. यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्ती द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सिमेंट रस्त्याची मागणी
साखरा : सेनगाव तालुक्यातील साखरा गावात एकही पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल जमा होऊन यामध्ये अनेक वाहने फसत असतात. यासाठी गावात सिमेंट रस्ते करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत. गावातील मुरूमाच्या रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनधारकांना वाहन चालविताना मोठा त्रास होत आहे.
नालीतील पाणी रस्त्यावर साचले
पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील काही वाॅर्डातील नाल्या तुंबल्या आहेत. या नालीतील घाण पाणी रस्त्यावर जमा होत असून पादचाऱ्यांना व वाहनधारकांना या घाण पाण्यातून रस्ता काढावा लागत आहे. तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने गावात दुर्गंधीही पसरत आहेे.
कहाकर बु. येथे क्रिकेट स्पर्धा
कहाकर बु.: सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथे जयहिंद क्रिकेट क्लबच्या वतीने २६ जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषीक २२ हजार, द्वितीय पारितोषिक ११ हजार, तृतीय पारितोषिक ७ हजार, चतुर्थ पारितोषिक ५ हजार यासह इतरही बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या क्रिकेट स्पर्धेमध्ये परिसरातील क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन जयहिंद क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
औंढा नागनाथ : तालुक्यातील येहळेगाव सो. गावाचा वीजपुरवठा मागील दोन महिन्यांपासून वारंवार खंडित होत आहे. या खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे अनेकांची वीज उपकरणेही जळाली आहेत. यासाठी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांतून होत आहे.
शेगाव खोडके येथे क्रिकेट स्पर्धा
कहाकर बु. : सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथे २५ जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक ११ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ३ हजार यासह इतरही बक्षीस ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवशंभू क्रिकेट क्लब यांच्या वतीने करण्यात आले आहे.