रोपट्यांना पाणी देण्याची गरज
हिंगोली: शहरातील प्रमु्ख मार्गावर नगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे. लावलेली रोपटे सध्या चांगल्या स्थितीत असून रोपट्यांचे झाडात रूपांतर होत आहे. मात्र, काही भागांतील रोपट्यांना सध्या पाणी देण्याची गरज असून, पाणी दिल्यास ही रोपटे जगण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रोपट्यांना नियमित पाणी देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
कळमनुरी : तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. त्यामुळे या भागात वन्य प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश पाणीसाठे आटत आहेत. ओढ्यातील पाणीही आटले असून, वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. त्यामुळे वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. याकडे लक्ष देऊन डोंगराळ भागात पाणसाठे उभारावेत, अशी मागणी होत आहे.
साइडपट्ट्या भरण्याची मागणी
आखाडा बाळापूर: कळमनुरी तालुक्यातील जरोडा ते साळवा पाटीदरम्यानच्या हिंगोली ते नांदेड मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे वाहने खाली उतरल्यास पुन्हा डांबरी रस्त्यावर घेताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक वेळा अपघाताला सामोरे जावे लागत आहे. याकडे लक्ष देऊन दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या भरण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांतून होत आहे.
बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला
हिंगोली: शहरातील बस स्थानकातून परभणी, नांदेड, अकोला, रिसोड आदी मार्गावरून आलेल्या बसेस थांबतात. हिंगोली मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बसेसची ये-जा असते. मात्र, काही दिवसांपासून येथील बस स्थानकात दारुड्यांचा वावर वाढला आहे. याचा प्रवाशांना त्रास होत आहे. याकडे लक्ष देऊन दारुड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हातपंप दुरुस्तीची मागणी
कळमनुरी : तालुक्यातील काही गावांत पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. त्यात महावितरण कंपनीने वीज बिल थकल्याने वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र हाती घेतले आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांना याचा फटका बसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ हातपंपाचे पाणी वापरत आहेत. मात्र, अनेक हातपंपांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन हातपंपांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.