- इस्माईल जाहगीरदारवसमत : एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीस जिल्ह्यातून गावठी पिस्तूलासह अटक करण्यात आली. गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण असे आरोपीचे नाव असून ही कारवाई वसमत शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात ८ मार्च रोजी रात्री ८:१५ वाजता केली.
वसमत येथील गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण याचेविरूद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यास त्याच्या इतर साथीदारांसह १ वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपार केल्यानंतरही तो वसमत परिसरात येत असून त्याचेकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. ८ मार्च रोजी रात्री ८. १५ वाजेच्या सुमारास वसमत येथील रेल्वे स्टेशन परिसरात सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या पथकाने सापळा लावला.
मात्र, पोलिस आल्याचे समजताच गुलाबसिंग भुऱ्यासिंग चव्हाण पळून जात होता. पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला १ गावठी पिस्तूल आढळून आले. पथकाने गावठी पिस्तूल जप्त केले असून त्याचेविरूद्ध वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू, पोलिस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे यांच्या पथकाने केली.