हिंगोली : मागच्या वेळी परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी तालुक्यातून निवडायचे संचालक बिनविरोध झाले होते. यंदा मात्र ऐनवेळी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून आधी चाचपडणाऱ्यांनीही आता अर्ज भरल्याने निवडणुकीतील रंगत वाढणार आहे. सोसायटी प्रतिनिधींना मात्र यामुळे चांगलाच ‘भाव’ येणार आहे. बँकेची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेता, या निवडणुकीत अनेकांना अचानक रस निर्माण झाला आहे. तर, काहींना मागील अनेक वर्षांपासून असलेले तेच ते चेहरे आता मतदार नाकारतील, असे वाटत असल्याने मैदानात उडी घेतली आहे. अशा सर्वांची आता माघारीसाठी मनधरणी करण्यात येत असल्याचे दिसते. त्यामुळे १० मार्च ही माघारीची अंतिम तारीख असल्याने त्यानंतर कोण रिंगणात राहते, यावरच सगळी भिस्त आहे. तसेही आ. सुरेश वरपूडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांच्यापैकी एका पॅनलमध्ये जागा निश्चित झाली, तर तिकडूनही रसद मिळेल, या अपेक्षेने काहींनी अर्ज भरले आहेत. हिंगोलीतून आ. तान्हाजी मुटकुळे यांना आव्हान देण्यासाठी दत्तराव जाधव, गुलाब सरकटे यांनी अर्ज भरले आहेत. आधी येथे एकही इच्छुक दिसत नव्हता. कळमनुरीत सुरेश वडगावकर यांच्यासमोर माजी खा. शिवाजी माने हे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे. शिवाय, यशोदाबाई चव्हाण यांचाही अर्ज आहे. सेनगावातही विद्यमान संचालक साहेबराव पाटील व त्यांची सून रूपाली पाटील यांच्यापैकी एक अर्ज राहणार असून विरोधी गटाकडून राजेंद्र देशमुख हे नाव निश्चित आहे. दोन्हीकडूनही प्रचारकार्य सुरू झाले. वसमतला ना.. ना... म्हणताना विद्यमान संचालक आंबादास भोसले यांच्याविरोधात आ. राजू नवघरे यांनी अर्ज भरला आहे. शिवाय, भाजपचे खोब्राजी नरवाडे, सविता नादरे, दत्तराव काळे असे एकूण पाच अर्ज आले आहेत.
औंढ्यात अपेक्षेप्रमाणेच यंदा चार अर्ज आले. यात विद्यमान संचालक गयबाराव नाईक यांच्यासह जि.प. उपाध्यक्ष मनीष आखरे, शेषराव कदम, माजी जि.प. अध्यक्ष राजेश गोरेगावकर हेही आहेत. यातील गोरेगावकर व आखरे यांच्या भूमिकेकडे लक्ष आहे. आखरे यांनी इतर मागासमध्येही अर्ज ठेवला. तर, गोरेगावकर यांना उभे राहायचे, तर त्यांच्या घरातूनच दोन पॅनलमध्ये दोन उमेदवार होण्याची शक्यता आहे. इतर शेतीमध्ये ज्ञानेश्वर जाधव, महिला प्रतिनिधींमध्ये रूपाली पाटील-गोरेगावकर, वेणूबाई तातेराव आहेर असे इतरही काही अर्ज आहेत.
जास्त अर्ज भरून सुचवताहेत पर्याय
तालुक्यातील मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघांत कायम परभणी जिल्ह्यातील उमेदवारांनाच पॅनलप्रमुख प्राधान्य देतात. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेकांना उमेदवारीतच गाळले जाते. यावेळी मात्र कुणी आमच्या पक्षाला प्रतिनिधित्व मिळावे म्हणून, तर कुणी या मतदारसंघातून माघारीसाठी त्या मतदारसंघात संधी द्या, अशा वाटाघाटी करून जेरीस आणताना दिसत आहेत. कायम परभणीचाच वरचष्मा राहणारे मतदारसंघही यावेळी काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागच्यावेळी केवळ रूपाली पाटील महिलांमधून निवडून आल्या होत्या.