हिंगोली : औंढा नागनाथ येथे चक्क ताडपत्रीचा तंबू ठोकून दारू विक्री सुरू केल्याने मद्यपींच्या त्रासाला नागरिक वैतागले असून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सदरील दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना १९ जून दिले आहे. टाळेबंदीतही सदर दारू विक्रेत्याकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
औंढा नागनाथ येथे एका दारूविक्रेत्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिला आहे. परंतु विक्रेत्यांकडून नियमबाह्य पद्धतीने दारू विक्री सुरू असून सोशल डिस्टन्सच्या नियमांची पायमल्ली होत आहे. शिवाय याबाबत संबंधित राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दखल घेतली जात नाही, असेही नागरिक सांगत आहेत. परंतु ताडपत्रीच्या तंबूत तळीरामांची गर्दी वाढू लागली असून त्याचा इतर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकारामुळे वैतागलेल्या नागरिकांनी शुक्रवारी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदनाद्वारे रीतसर तक्रार केली आहे. तसेच संबंधित दारू दुकानाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर श्रीराम राठी, रामनिवास राठी, लक्ष्मण पवार, प्रवीण सोनी, सुनील मस्के, पठाण जाफरखाँ शेर खाँ, शे. खाजा. शे. सरदार यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.