हिंगोली शहराची लोकसंख्या व वस्ती वाढत आहे. त्यामुळे शहराच्या चारही बाजूंनी बांधकामे वाढली आहेत. अनेकांनी कोरोनामुळे बांधकामे अर्धवट करून ठेवली आहेत. त्यात कोरोनामुळे अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. यातून नवीन चेहरे गुन्हेगारीकडे वळत आहेत. निर्जनस्थळी गाठून लुटमार, महिला छेडछाडीचे प्रकार घडत असल्याचे निदर्शनास येताच हिंगोली शहर पोलिसांनी शहरातील गस्त वाढविली. त्यामुळेच कोरोनाकाळातही गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यात पोलिसांना यश आले. मात्र काही दिवसांपूर्वी एनटीसी भागातील नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी अल्पवयीन मुलीवर एकाने अत्याचार केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीच्या लगेच मुसक्या आवळल्या. तसेच साध्या गणवेशातील पोलीस कर्मचाऱ्यांसह गणवेशातील कर्मचाऱ्यांची शहरात गस्त वाढविली. यामुळेच अनूचित प्रकाराला आळा घालण्यात पोलिसांना यश आले.
ही ठिकाणे धोक्याचीच
रामलीला मैदान परिसर
हिंगोली शहरातील रामलीला मैदान परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक दारुडे, टपोरी मुले थांबलेली असतात. रात्रीच्या वेळी तर मोठी सावधगिरी बाळगावी लागते. कोणत्याही कारणाने पादचाऱ्याला थांबवून त्याच्याशी वाद घालणारी काही टपोरी मुले येथे दिसून येतात.
रेल्वे स्टेशन परिसर
हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रात्री उशिरापर्यंत काही दारुडे असतात. जिजामाता, आंबेडकरनगर, ज्योतीनगर, विशालनगर, हमालवाडी परिसरातील नागरिकांना येथून जावे लागते. या ठिकाणी एकट्या नागरिकास वाद घालून लुटमार होण्याच्या घटना घडतात.
रेल्वे उड्डाणपूल परिसर
हिंगोली शहरातील रेल्वे उड्डाणपुल परिसरातही काही टपोरी मुले सायंकाळच्या वेळी थांबतात. यापूर्वी येथे एकास लुटल्याची घटना घडली होती.
जुनी जि. प. इमारत ते नवीन जि. प. इमारत रोड
हिंगोली शहरातील जुनी जिल्हा परिषद इमारत ते नवीन जिल्हा परिषद इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक टपोरी मुले रात्रीच्या वेळी धूमस्टाइल दुचाकी पळवित असतात. जवळील मैदानावरही धूम्रपान करणे, दारू पिणे असे प्रकार घडतात. यातून गुन्हेगारीला बळ मिळते.
निर्जनस्थळांचा शोध घेणे गरजेचे
हिंगोली शहरातील निर्जनस्थळे गुन्हेगारांचे अड्डेच असतात. त्यामुळे निर्जनस्थळांचा शोध घेऊन तेथे थांबणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण केल्यास छेडछाड व लुटमारीच्या घटना रोखण्यात मदत होईल.
हिंगोली शहरात दोन चारचाकी, तीन दुचाकी वाहनाद्वारे १३ पोलीस अधिकारी, कर्मचारी रात्रीला नियमित गस्त घालतात. या शिवाय दिवसाही वर्दळीच्या ठिकाणी कर्मचारी लक्ष ठेवून असतात.
- पंडित कच्छवे, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे, हिंगोली
शहरातील विनयभंग व बलात्काराच्या घटना
वर्ष संख्या
२०१८ १९
२०१९ १८
२०२० ११
२०२१ १०