गोरेगाव (जि. हिंगोली) - शेतमालाला भाव मिळत नाही, पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत, या व इतर मागण्यांसाठी गोरेगाव व परिसरातील शेतकरी मुंबईला गेले आहेत. धनी जवळ नाही, प्रशासनही दखल घ्यायला तयार नाही. आता आम्ही जगून काय उपयोग, असे म्हणून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी रविवारी गोरेगाव अपर तहसील कार्यालयासमोर मुलाबाळांसह मागणीचे निवेदन गेटला चिकटविले.
कुटुंब धडकले तहसील कचेरीवर-अनेकांनी उसनवारी करून खरीप पिकांची पेरणी केली. परंतु उसनवारी फिटेल एवढे पैसे उत्पन्नातून निघाले नाहीत. त्यामुळे अवयव विकण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. -२२ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांनी ‘आमची किडनी, डोळे, लिव्हर हे अवयव विकत घ्या आणि बँक कर्जाची परतफेड करा,’ असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे पाठविला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी गोरेगाव व परिसरातील शेतकरी स्वत:ला श्रद्धांजली वाहून मुंबईला गेले. - याबाबत प्रशासन दखल घ्यायला तयार नसल्याने सदर शेतकऱ्यांच्या पत्नी-मुलाबाळांसह कुटुंबातील मंडळींनी रविवारी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयासमोर घोषणा देत सरकारचा निषेध केला.
निवेदनात तीन वर्षांच्या मुलांचीही नावे-अवयव विक्रीकरिता शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसह सिद्धी कावरखे (३), भक्ती कावरखे (८), आदित्य कावरखे (९), आराध्या कावरखे (४), रोहन मुळे (९) या तीन ते नऊ वर्षे वयोगटांतील लहान मुलांची नावे निवेदनामध्ये नमूद करण्यात आली. - प्रत्येकी किडनी ६० हजार रुपये, लिव्हर ५० हजार रुपये, डोळे २० हजार रुपये दराचा उल्लेखही करण्यात आला आहे. निवेदनावर वैशाली कावरखे, संगीता पतंगे, रेखा मुळे, अनिता कावरखे, शोभा कावरखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.