लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. समाजबांधवांनी एकत्र येऊन झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी आरक्षण मागणीच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी लहुजी शेवाळे, विठ्ठल रबदडे, अॅड. बाबा नाईक, सुरेश भुमरे, अॅड. के. के. शिंदे, शिवाजी ढाले, विनोद नाईक, रवि गडदे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्टÑातील धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या प्रवर्गात समावेश असूनही राज्यातील धनगर समाजबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती तात्काळ लागू करू, असे सत्ताधाऱ्यांनी आवश्वास दिले होते. मात्र अद्याप याबाबत अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे धनगर समाज बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करीत आहे. आतापर्यंत सरकारच्या अडीचशे कॅबिनेटच्या बैठका झाल्या. परंतु एकाही बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला नसल्याचे आ. रामराव वडकुते म्हणाले. आंदोलनाचा पहिला टप्पा २७ आॅगस्ट रोजी होणार असून राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय धनगर वेशभूषेत संस्कृतीचे दर्शन घडवून आंदोलन केले जाणार आहे. पक्षपात बाजूला ठेवून समाजबांधव एकत्र येणार आहे. यावेळी समन्वय समिती वेळोवेळी आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.टप्प्या-टप्प्याने केले जाणार आंदोलन...४धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास उग्र आंदोलन केले जाईल. ३० सप्टेंबर रोजी परभणी येथे राज्यव्यापी ‘धनगर आरक्षण एल्गार महामेळावा’ होणार आहे. या ठिकाणी आंदोलनाचा हा दुसरा टप्पा असणार आहे. एल्गार महामेळाव्यात जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त समाजबांधव सहभागी होणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले.
धनगर आरक्षणासाठी ढोल-जागर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:38 AM