लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या कळमनुरी तालुक्यातील रामवाडी ग्रामस्थांनी सामूहिक धोंडेजेवणाचा कार्यक्रम ठेवत लेकीबाळी, जावयांनाही श्रमदानाच्या कामात सहभागी करून घेतले. स्पर्धेतील वेळ वाया जावू नये, यासाठी नामी शक्कल लढवताना परंपरेचीही जोपासणा केली.रामवाडी या गावातील सर्व ग्रामस्थ या धोंडा जेवणाला उपस्थित होते. विशेष म्हणजे गावातील ज्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या त्या सर्व मुलींना जावयासह माहेरी आदरातिथ्याने बोलविण्यात आले. सर्व लेकीबाळी जावयासह माहेरी परत आल्या सकाळी सर्वांनी मिळून श्रमदान केले.रात्री गावामध्ये सामूहिक धोंडे जेवणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सर्व लेकीबाळींच्या सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम गावाच्या मंदिरावर ठेवण्यात आला होता. सत्कार सोहळ्यामध्ये मुली व जावयांना अक्षता-कुंकू लावून ओवाळ्णी घालण्यात आली. जावयांना नारळ-उपरणी व लेकीबाळींना ब्लाऊज पिस देण्यात आले.या उपक्रमामुळे गावामध्ये एकजूट व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सर्व ग्रामस्थांनी धोंडा जेवणाचा आनंद घेतला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी पुन्हा आपल्या शिवारामध्ये जावून पाहुणे मंडळीसह ग्रामस्थांनी श्रमदानाचे काम केले.या गाव धोंडा जेवण कार्यक्रम सोहळ्याला आमदार डॉ. संतोष टारफे, वंदनाताई टारफे, तहसीलदार प्रतिभाताई गोरे, भारतीय जैन संघटना, पत्रकार संघटना, पाणी फाउंडेशनचे पथक आदी उपस्थित होते.
श्रमदानासाठी रामवाडीत धोंडेजेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:56 AM