शेवाळा : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे दिनांक ३० डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास बिबट्या गावालगतच्या चौकातून गेल्याचे अनेकांनी पाहिले. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेवाळा परिसरातील आबादानी मार्गावरील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानाजवळ संजय सूर्यवंशी यांच्यासह काहीजण शेकाेटी करून बसले हाेते. रात्री ११. ३० वाजण्याच्या सुमारास अचानक येथून बिबट्याने धूम ठाेकल्याचे त्यांनी पाहिले. यावेळी श्वानही भुंकू लागले. या दरम्यान शेतकरी निळकंठ सावंत हे दुचाकीवरून शेताकडे जात हाेते. त्यांच्या दुचाकीसमाेरून बिबट्या गेल्याने त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली अन् दुचाकी बाजूच्या भिंतीला धडकली. यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना जागे करून गावात बिबट्या आल्याचे सांगितले. त्यानंतर ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. यानंतर अनेकजण बिबट्या गेल्याचे सांगत हाेते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संजय सूर्यवंशी यांनी वन विभागाला बिबट्या दिसल्याची माहिती दिल्यानंतर वनपाल सावळे, वनरक्षक फड, कचरे यांनी गुरूवारी सकाळी गावात येत या भागाची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना सतर्कता बाळगत काळजी घेण्याचे आवाहन केले. बिबट्या दिसल्यास त्वरित वन विभागाला कळवावे, शेतकऱ्यांनी शेतात कामे करताना काळजी घ्यावी, असे आवाहन केले.
फाेटाे नं ०६