वारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथे एका गुटखा विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २५ जून रोजी कारवाई करीत त्याच्याकडून ७१ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
कळमनुरी तालुक्यातील डिग्रस बु. येथे एकजण शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार २५ जून रोजी पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, सपोउपनि बालाजी बोके, पो.ह. भगवान आडे, संभाजी लेकूळे, राजू ठाकूर, किशोर सावंत, ज्ञानेश्वर सावळे, ठाकरे यांच्या पथकाने डिग्रस बु. येथील धर्मराज रामजी बोडखे याच्याकडे तपासणी केली असता त्याच्याकडे ७१ हजार १०० रलपये किमतीचा माणिकचंद गुटखा, सितार पान मसाला गुटखा, सुगंधी तंबाखू, राज निवास पान मसाला आढळून आला. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत धर्मराज रामजी बोडखे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, वारंगा फाटा, जवळा पांचाळ, तसेच वसमत तालुक्यातून या भागात गुटखा मोठ्या प्रमाणावर येत आहे. त्यामुळे गुटखा सहज उपलब्ध होत आहे. सकाळच्या सुमारास दुचाकीवरूनच गावोगावी गुटखा पोहोचत केला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.