हिंगोलीत काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी सातव समर्थक दिलीप देसाईंना संधी
By विजय पाटील | Published: August 6, 2022 03:26 PM2022-08-06T15:26:37+5:302022-08-06T15:26:53+5:30
या जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर धुमश्चक्री सुरू होती.
हिंगोली : मागील पाच ते सहा महिन्यांपासून सुरू असलेले काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचे चर्वितचर्वण अखेर प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमल्याने संपल्यात जमा असल्याचे चित्र आहे. दिवंगत खा. राजीव सातव यांचे कट्टर समर्थक, जुने निष्ठावंत व राजकीय दबदबा असलेल्या दिलीपराव देसाई यांना या पदावर संधी मिळाली आहे.
या जिल्हाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर धुमश्चक्री सुरू होती. आ.प्रज्ञा सातव व माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यापैकी कुणाच्या गटाच्या गळ्यात ही माळ पडेल, यावरून उत्सूकता होती. सुरुवातीच्या काळात दोन्ही गटांच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मुंबईच्या वाऱ्या केल्या. या पदावर दावा करण्यासाठी समर्थकांनाही कामाला लावले होते. हिंगोली व कळमनुरीच्या वादात वसमत मतदारसंघात हे पद देण्यापर्यंत टोकाचे वाद झाले होते. मात्र यावर निर्णय झाला नव्हता. मध्येच राज्यात सत्तांतर झाले. त्याचा धुरळा शांत झाला अन् काँग्रेसने प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून दिलीपराव देसाई यांचे नाव जाहीर केले.
देसाई हे दिवंगत खा.राजीव सातव यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. कळमनुरी विधानसभेत त्यांचा पक्षालाही फायदा होऊ शकतो. शिवाय मितभाषी आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे काँग्रेसमधील गटा-तटाच्या भिंती कोसळवण्याची त्यांची क्षमता आहे. कदाचित याच कारणाने पक्षाने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे चित्र आहे.