हिंगोली: प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या व राष्ट्रीय संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र नर्सी येथे कार्तीक प्रबोधिनी एकादशीला राष्ट्रीय संत शिरोमणी श्री संत नामदेव महाराज यांचा ७५३ वा जन्मोत्सव सोहळा २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता मोठ्या भक्तिमय वातावरणात पणत्या पेटवून दिपोत्सवाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्री संत नामदेव महाराज यांच्या ७५३ व्या जयंती सोहळ्या निमित्त संत नामदेव मंदिर संस्थान व परिसरातील भाविकांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुवारी सकाळी ६ वाजता श्री च्या वस्त्र समाधीची महापूजा,आरती, अभिषेक करुन व मंदिर परिसरात रांगोळी पणत्या पेटवून दिपोत्सवाने नामदेवाचा जन्मोत्सव जयंती सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी मंदिर परिसर व घाट परिसरात पणत्या पेटवून दिपोत्सव साजरा करण्यात आला.तसेच मंदिरामध्ये फुलातून आकर्षक रांगोळी काढण्यात आल्या तसेच संत नामदेव महाराज यांच्या मंदिरावर सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने संपूर्ण मंदिर परिसर रोषणाईने उजळून निघाले होते. जन्मोत्सवानिमित्त मंदिर परिसरात आरती,भजन कीर्तन, प्रवचन,आदि धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. संत नामदेवांच्या जन्मोत्सव सोहळ्याला नर्सीसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सकाळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.