याबाबत आमदार सतीश चव्हाण यांनी आधीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पत्र पाठवून औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयातून पाठविलेल्या पंधरापैकी किती व्हेंटिलेटर सुरू आहेत याची माहिती मागविली होती. त्यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी मात्र सर्व सुरू असल्याचे त्यांना कळविले होते. गुरुवारी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास चव्हाण यांनी भेट देऊन सदरील व्हेंटिलेटरची पाहणी केली. यातील फक्त एकच व्हेंटिलेटर वापरात असून, तेही बायपॅप मोडवर वापरले जात आहे. त्यातूनही ऑक्सिजन सप्लाय व्यवस्थित होत नसल्याने त्याला अन्य स्त्रोताने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले. तुम्ही आज दिलेल्या पत्राने माझे समाधान झाले नसून वस्तुनिष्ठ तपशील देण्याची मागणी चव्हाण यांनी डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांच्याकडे केली. डॉ.राजेंद्र सूर्यवंशी यांनी आमदार सतीश चव्हाण यांना पुन्हा एक पत्र दिले. या पत्रात १५ पैकी दोन व्हेंटिलेटर सुरू होत नाहीत. उर्वरित १३ व्हेंटिलेटरला पुरेशा दाबाने ऑक्सिजन पुरवठा देऊन कार्यान्वित केले असता त्यामध्येे एअर आणि ऑक्सिजन सप्लाय फेल्ड असा मॅसेज दिसून येत आहे. सर्व व्हेंटिलेटरर्सला बॅटरी बॅकअप पुरेसा नाही, यापैकी दोन व्हेंटिलेटर बायपॅप मोडवर वापरले असता त्यास अन्य स्त्रोत्राने अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा द्यावा लागत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदरील व्हेंटिलेटर वापरण्यायोग्य नसल्याची माहिती असतानासुद्धा ते वापरण्याचा अट्टाहास आरोग्य यंत्रणेकडून का केला जातोय, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. हे व्हेंटिलेटर वापरासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेवर कुणाचा दबाव येत असेल तर राज्य शासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांचीही उपस्थिती होती.
आमदारांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत एकच व्हेंटिलेटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:30 AM