हिंगोली जिल्हा परिषदेच्या इतिहासात यापूर्वीही एकदा अविश्वासाचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी तो प्रयत्न असफल ठरला. आता ही दुसरी वेळ आहे. त्यावेळी मतभेद व सदस्यांतील नाराजीही होती. मात्र मतभेद दूर झाल्याने पदाधिकारी बचावले होते. यावेळी मतभेदापेक्षा नाराजीचाच भाग जास्त आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्य एकवटल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही अविश्वास दाखल झाल्याच्या एक ते दोन दिवसांपर्यंत सभापती चव्हाण यांच्या समर्थनार्थ तीन ते चार सदस्य इतरांची मनधरणी करताना दिसत होते. ही मने वळविणारे शिक्षण समितीवरील सदस्यच असल्याचे दिसून येत होेते. मात्र कालपासून अचानक तेही विरोधाची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे अविश्वासाची टांगती तलवार चव्हाण परतावून लावतील, असे वाटत असतानाच आता पुन्हा बुडत्याचा पाय खोलात असे चित्र दिसू लागले आहे. ज्या स्वकियांच्या जोरावर त्यांनी कृषीऐवजी शिक्षण मिळविले, ते स्वकीयच उघडपणे विरोधाची भाषा बोलू लागले आहेत. त्यामुळे चव्हाण यांना बचावासाठी आणखी जोरदार प्रयत्न करावे लागणार असल्याचे दिसत आहे. ३४ सदस्य विरोधात गेल्यास त्यांच्यावरील अविश्वास पारित होवू शकतो. त्यामुळे १८ ते २० सदस्यांचे समर्थन त्यांना मिळणे अपेक्षित आहे.
विरोधक म्हणून ज्यांनी यासाठी पुढाकार घेतला, अशी मंडळी आता सदस्यांची एकजूट कायम राहील, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळेच अविश्वास आलाच तर या पदावर कोण बसणार, याची साधी चर्चाही करू दिली जात नाही. तर दुसरीकडे चव्हाण यांनी नेतेमंडळींना साकडे घालतानाच सदस्यांशी वैयक्तिक संपर्क साधून आपली कैफियत मांडत समर्थन मागितले आहे.
एकमेकांवर नजर
ऐनवेळी घात होवू नये असे दोन्ही गटांना वाटत आहे. त्यामुळे दोन्ही गट एकमेकांच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. नेतेमंडळींना भेटण्यापासून ते सदस्यांशी संपर्क साधण्यापर्यंतच्या या हालचाली टिपल्या जात आहेत. एकाने संपर्क साधला की दुसरा ब्रेन वॉश करीत आहे. त्यामुळे सदस्यांमध्ये याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.