लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी सवलतीचा व वहन आकारासह ४ रुपये ३८ पैसे प्रतियुनिट या माफक वीजदराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.गणेश उत्सव सण हा काही दिंवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पुर्वतयारी म्हणून महावितरणने अधिकृत वीजजोडीणीचे आवाहन केले आहे. तात्पुरत्या वीजजोडणीच्या बिलींगची प्रक्रिया झाल्यानंतर वीजमीटरसाठी घेतलेल्या रक्कमेतील उर्वरित रक्कम गणेश मंडळांना त्वरीत परत करण्याच्या सूचना क्षेत्रिय कार्यालयांना दिल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच घ्यावी. अर्थिंगचीही खबरदारी घेण्यात यावी. वापरण्यात येणारे वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी टिनपत्र्यांचा वापर होत असल्याने वायर्स लूज किंवा अनेक ठिकाणी तुटलेले पण टेपने जोडलेले असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची शक्यता असते. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते, आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. विजेच्या लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा गणेशोत्सवातील आणि मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही. अशा सुरक्षित अंतरावर देखावे करावेत. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये.सार्वजनिक उत्सवाकरीता तात्पुरती वीज जोडणीसर्वधमीर्यांच्या सार्वजनिक उत्सवांकरिता तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट ३ रुपये २० पैसे अधिक १ रुपया १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे ४ रुपये ३८ पैसे प्रती युनिट असे वीजदर आहेत. वहन आकारासह हा दर घरगुती वीजदरापेक्षा फक्त १३ पैशांनी अधिक आहे तर वाणिज्यिक दरापेक्षा २ रुपये ९० पैसे प्रतियुनिटने कमी आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घ्यावा आणि त्यायोगे सार्वजनिक सुरक्षेला महत्व द्यावे, यासाठी तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आलेला आहे. तातडीच्या मदतीसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी २४ तास सुरु असणारे टोलफ्री क्रमांक १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित अभियंता यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत.
सार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीजदर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:45 AM