लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या सोमवारी बदल्या झाल्या असून बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. मात्र विस्थापीत ३७० शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न कायम आहे. अनियमिततेमुळेच बदली न झाल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ३७० शिक्षकांनी मंगळवारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांना निवेदन दिले.शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची आॅनलाईन प्रक्रिया पार पडली. २८ मे रोजी जिल्ह्यातील १४५२ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. परंतु ३३३ प्राथमिक शिक्षक, २२ विषय शिक्षक व १५ उच्चश्रेणी मुख्याध्यापक असे एकूण ३७० जण विस्थापित झाले आहेत. जि. प. शिक्षकांच्या आॅनलाईन जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये अनियमिततेमुळेच या शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बदल्यांची समस्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोडवावी, अशी मागणी या शिक्षकांनी केली आहे. याबाबत जि.प. प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये विस्थापित झालेल्या ३७० शिक्षकांना विषय शिक्षक व निव्वळ रिक्त पदाच्या उपलब्ध जागा पोर्टलमधून भरण्याची परवानगी देऊन रॅण्डम राऊंड सुरू होण्यापूर्वी २० गावांचा पसंतीक्रमांक देण्यासाठी रिक्त पदांची व विषय शिक्षकांच्या रिक्त जागांची यादी उपलब्ध करून देण्यात यावी, २७फेबु्रवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार अवघडक्षेत्र निश्चितीनंतर प्रत्यक्ष बदली कार्यवाही पूर्वी किमान १ महिन्यापुर्वी सामानीकरणाने रिक्त ठेवायच्या जागा घोषित करणे आवश्यक असतानाही जि.प.ने त्या घोषित केल्या नाहीत. आॅनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वासरे संवर्ग ४ चे आॅनलाईन पसंती क्रमांक देण्याची मुदत संपण्याच्या कालावधीच्या दोन दिवस अगोदर याद्या जाहीर केल्या. परंतु अधिकृत प्रसिद्ध केल्या नाहीत. त्यामुळे पसंतीक्रमांकाची गावे निवडताना गोंधळ होऊन अधिक शिक्षक विस्थापित झाले.३७० पैकी एकत्र असलेल्या शिक्षक पती-पत्नी यांच्यामधून १७० शिक्षिका विस्थापित झाल्याने गैरसोय होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासह विविध समस्यांमुळे जास्तीत जास्त शिक्षक विस्थापित राहिले आहेत. त्यामुळे बदली न झालेल्या शिक्षकांच्या समस्या सोडवावी, तसेच यावर प्रशासन स्तरावर उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही निवेदनाद्वारे शिक्षकांनी केली आहे. ३१ मेपर्यंत विस्थापित सर्व शिक्षकांना आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.
विस्थापित शिक्षकांनी दिले प्रशासनास निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:13 AM